Vaishali Batale

कविता एक स्पंदन असते, कधी कधी रणकंदन असते, कविता अशी-अशी असावी, असे काही बंधन नसते.

अपूर्ण

उगवत्या सूर्याने दिले आज उषेला धाडून
मन अधीर असे तुला पाहाण्या आधी गेले पुरते बावरुन ...
शब्द मर्यादित होते याची जाणीव माझ्या डोळ्यांना
भाव मनीचे कळले परी नकळत दो हृदयाना
घेई मन असा ध्यास, नव्हता त्यास उदासीनतेचा रंग
माझी प्रीत इन्द्रधनुष्यापरी उठती तुझ्या मनी तरंग...
माझ्या मनीच्या वादळाचे बिंब तुझ्या डोळ्यांत
अबोल झाली प्रीत राही बिचारी मनाच्या एका कप्प्यात !
वास्तवाने विझविली प्रीतीची तेवती फुलवात
एक कथा संपली जिची नाही झाली कधी सुरुवात...

- वैशाली बताले.

एका क्षणार्धात घडले सारे काह़ी...
एका क्षणार्धात घडले सारे काह़ी
अन वेदनांनी थरकापल्या दिशा दाही...
ओढ़ सर्वाना एकच घरटयाकडे परतण्याची
अपेक्षाही नव्हती अशा ऊदध्वस्त क्षणाची
आणि क्षण हा मग उभा ठाकला
निरपराध किंकाळ्यानी आसमंत रडवेला झाला
काय होते,काय झाले,त्या एका क्षणाने होत्याचे नव्हते झाले
झाला चिखल रक्तमांसाचा,मोडला संसार कैकांचा !
त्या संहाराने क्षणभर नियतीही हळहळली
निष्प्राण कलेवरांनी धरणीही कळवली
नि:शब्द आकाश झाले
निरपराध हकनाक मेले
मरणारा केवळ माणूस होता...तो हिंदूही होता मुसलमानही होता !
जे जे मेले ते यातून सुटले
जे अपंग झाले ते जीवंत असूनही मेले !
जगणार होते ते रोज एक नित्य नवे मरण
कारण बनतो कधी माणूसही परिस्थिती शरण !
अशा कित्येक संसाराची,स्वप्नांची राखरांगोळी काळाने का पाहावी ?
इतिहासाची वारंवार पुनरावृत्ती का व्हावी ?
आकाश धरतीला म्हणाले काही
तो मूक आवाज कुणी ऐकला की नाही !
एका क्षणार्धात घडले सारे काह़ी
माणूस आता माणूस राहिला नाही...
कलियुगाचा महिमा हा ही
मरणाची मालिका तू या डोळ्यांनी पाही
कारण माणूस आता माणूस राहिला नाही ...
सामूहिक प्रेतांच्या स्मशानात चित्ता जळत राहिल्या काह़ी
चितांनी मग मनातले प्रश्न स्मशानाला विचारले काह़ी
कारण प्रश्नांशिवाय काह़ीच उरले नाही
त्या प्रश्नांची स्मशानालाही उत्तरे माहीत नाही
सुन्न मी, सुन्न तू आणि सुन्न तो ही !!!
- वैशाली बताले.

।। यमदीपदान ।।


राजा असो वा रंक सर्वानी तुकविली मान

यमराजाच्या बहिणीला वाटे भावाचा सार्थ अभिमान...

ओवाळिता यमराजा मन यमीचे विषण्ण

भाउबीजेला नच यावे कुण्या घरात मरण...

ओळखून भाव मनी यमाने दिले वरदान

दीप उजळा दारी करावे “यमदीपदान”

विधिलिखित मृत्यू परी जाईल परतोन

मृत्युदात्या यमराजाचे हे बहिणीला अभिवचन

भाउबीजेला नाही येणार कुणा अकाली मरण ।।

- वैशाली बताले.

!!! विवाहाचा २५ वा वाढदिवस !!!

पंचवीस वर्षे पूर्ण विवाह जाहल्याला
किती उन्हें सोसून लांब पडल्या सावल्या...
क्षण कसोटीचे किती सहजीवनावर आले सहजीवनावर
स्वत्व पणाला लागले केला नियतीने कहर !
साता जन्माची साथ तुझी मन कणखर झाले...
आप्त स्वकीय होते जणू तलवारी अन भाले !
असे वादळी जीवन कैकदा नाव भोव-यात सापडली
"दीपस्तंभ” होतीस तू माझ्या संसाराची सावली !!!

- वैशाली बताले

।। एका वृक्षाची अनवट कहाणी ।।
आरंभापासून अपार कष्ट एका वृक्षाने सोसले असे

उन्हाळ्याला सावली तर पोरक्याला माउली भासे

ॠतू येती,ॠतू जाती,बहर आणि पानगळतीची वृक्ष स्वीकारी कालगती

अशा संजीवन वृक्षाची नंतर सर्वदूर पसरली ख्याती

ऊन, वारा,पाणी यांचे तडाखे सोसून पण नाही पडला कधी तो मोडून ...

पुष्प वृष्टी होता आकाशातून, वृक्ष कृतज्ञ उभा तिथे दोन्ही कर जोडून

मुळं जमिनीत जाती आता पाण्याच्या शोधार्थ

फांद्या विस्तारत जाती परी जपती स्वत:चा स्वार्थ !

वृक्ष भव्य डेरेदार त्याच्या शाखा सर्वत्र पसरल्या

काही कुठारींसाठी मात्र त्याच शाखा मदतीला धावल्या ...

घाव बसे वर्मी मनी वृक्षाच्या घालमेल

उडाले पक्षी सारे परी बिलगून त्यास एक वेल

स्व:त्वावरचे वार झेलित वाटसरुंचा आधार झाले

नि:शब्द तरु आज अपमानाच्या आगीत भस्म झाले !

अपराध काय माझा ? का सोसावे लागे मला असे ?

घर फिरता क्षणी इतके फिरतात का हो कधी वासे ?

ओलाव्याचा शोध घेत मुळे गेली धरतीच्या पोटात

प्रकाशाचा वेध घेत फांद्या गेल्या आकाशाच्या गोटात

माझे सल माझ्या व्यथा आता व्यक्त करू मी कशा ?

दु:ख जाणावया नेहमी जावे लागे त्यांच्या वंशा !


वृक्ष होई अंतर्मुख दरी विचारांची संपवावी कशी ?

मुळं आणि फांद्या यांची पुन्हा जोडावी नाती कशी?

विचारांच्या मोहोळात आज वृक्ष छिनाभिन्न
कधी दिमाखात उभा आज भासे काळाकभिन्न !

चक्रीवादळांना न जुमानणा-या या वृक्षाची ही कथा

एक झुळकीत वा-याच्या उन्मळून पडले अंतरीची मोठी व्यथा ...

मुळे रुजलीच नाही काय मातीमध्ये फार

की मातीनेही मुळांना खरा दिला नाही का हो आधार ?

नाही जडले वृक्षाचे मातीशी कधी नाते

फांद्यांच्याही पल्याड राहिले आकाश फार दूर ते...
एका वृक्षाची अशी ही अनवट कहाणी

वृक्ष म्हणती तयास परी तो संस्थापक वा कुटुंब प्रमुख कोणी !

झाला पुनर्जन्म वसंतात वृक्षास कोवळी पालवी फुटली

सरला शिशिर जीवनातला वेल मनी सुखावली

भावनिकतेचा अनुबन्ध मुळं पानातून तिने रुजवला

एक अमृतवेलीच्या साथीने वृक्ष पुन्हा अन्गोपांगी बहरला...

- वैशाली बताले










** वाढदिवसाच्या रुपेरी शुभेच्छा **

नभी नक्षत्रांची दाटी पाहूनी चन्द्र म्हणाला अवनीस
आकाशाला स्वप्न पडलय गोड गुलाबी रम्य खास !

नक्षत्रे जरी सत्तावीस परी
स्वाती उठुनी दिसे तयात
या नक्षत्राचा पाउस बरसता
मोती होतसे शिम्पल्यात !
असू नसू ओंडके आम्ही
भेटलो ॠणनुबंधाच्या सागरात
बघ दुरावेल वाट कालगतीचीआम्ही क्षणभंगुर या भवसागरात !
वाढदिवसाच्या रुपेरी शुभेच्छाची
दर वर्षी होईल परी नादमधुर अखंड बरसात !!!

- वैशाली बताले.


भाऊबीज
काय मागावे मी किती मनी नाही माझ्या खंत
भाऊबीजेला ओवाळिते मी खरी भाग्यवंत !
असं सुरेल हे नातं, नाही नात्याला ते मोल
एका आईच्या उदरी जन्मली रत्न दोन अनमोल
दिवाळी आली घरी कशी हसता खेळता
भाऊबीज आज, झाली दिवाळीची सांगता
काय सांगू बाई त्याची अगणित कीर्ती
त्याच्या लोभस रुपाला माझ्या डोळ्यांची आरती ...
- वैशाली बताले.

सागरी किनारा आणि लाट

सागराची लाट सांगे किना-यास येउनी

विसरु नको वेडया मला पहा आले मी फिरुनी

अशा येती कैक लाटा जाई किनारा आनंदोनी

एक तरल नात्याची त्यांची हळूवार कहाणी...

ओहोटीची चाहूल लागता किनारा होई उदास

लाट जाई दूर दूर तसा किना-याचा कोंडे श्वास...

मनामनाचे जपले नाते एकाएकी संपले

ओहोटीच्या एका क्षणी कुणी माझे सर्वस्व लुटले ...

माळेमधले मणी एका क्षणी ओघळावे

दूर जावे सारे पक्षी अन झाड जसे एकटे उरावे!

जगरहाटी अशी ही ! किनारा खन्तावुनी जाई

तेलवाती विझोनी गेल्या उरली पितळी समई

ज्योत प्रेमाची अशी पुन्हा कधी चेतणार नाही

मी असा एकटा मला दुजा किनाराच नाही ...

लाट माझी अंतरीची जिव्हाळा जपला मी उरी

कसे कुणा पुसू ? माझे भविष्य आता काळाच्याच उदरी...

मउ रेती ओली लाट जाई बघता सरोनी

शुष्क वाळवंट झाले जाई आस जगण्याची मरोनी...

येइल का एक भरती यावी आवेगात आज

फिरुनी वाटावे मज जगावे खास आज

आणि एके दिवशी मग -

आली सागरा भरती आली आवेगात लाट

किना-याच्या आयुष्यात होई युगायुगान्ची पहाट!

स्पर्श होता लाटेचा किनारा थरारुनी जाई

मिळे नव संजीवनी किना-यास चेतल्या लक्ष वातींच्या समई !!

भरती आणि ओहोटी मनाच्या दोन कक्षा

इवल्याश्या मनाच्या किती असती अपेक्षा ?

एक विवेकी मन जणू दीपस्तम्भ सागरात...

मोहाच्या कैक लहरी फिक्या पडल्या मनसागरात !!

- वैशाली बताले

निळाई
निळ्या निळ्या सागराचे निळे निळे पाणी
निळ्या निळ्या आभाळाची निळी निळी गाणी
निळाईने व्यापला असा आसमंताचा पसारा
निळ्या सावळ्या हरी रुपाचा वेडा गोकुळ सारा
निळे पाणी, निळे अम्बर ,निळा भासे तो पारवा
नितळ निळ्या सागरकिनारी हवा हवासा गारवा...
एका घननिळ्यासाठी एक राधा होई वेडी
विशुद्ध प्रेमभावनेपोटी ती जनरीत
मोड़ी...
नसे ते गोकुळ, नसे ती राधा, परी वाजे कधी तो नादमधुर पावा
निळेपणाची मोहिनी नेई मज निळाईच्या गावा...
निळाईचा नितळ अनुभव जणू मर्मबंधातील ठेवा
- वैशाली बताले.

! ! ! परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !

कल्पकता आणि कृतीशीलतेची चढाओढ
मनाला असावी नेहमीच यशाची ओढ
क्षितिजही करेल पृथ्वी आणि आकाशाबरोबर
यावेळी कौतुकासाठी बंड जर
परीक्षेत तुम्हा यश मिळेल उदंड !
सरसर रिमझिमत्या पावसाच्या सप्तरंगी शुभेच्छा

-वैशाली बताले.


लग्नाचा प्रथम वाढदिवस आणि अपत्य जन्माची चाहूल

पहिल्या वहिल्याची नेहमीच अपूर्वाई
संसार वेलीवर उमलतील आता जाई आणि जुई...
सप्तरंगी इंद्र धनुष्याची रंगत यावी सहजीवनात
शुभेच्छाचे कारंजे आमच्या प्रत्येकाच्या मनात...
एक मधुर स्वप्न अवतर णार आता सत्यात
एक लोभस चेह-या ची वाट पाहतोय आम्ही घरात ...
समाधानाच्या वेली आणि वाहती सौख्याचे झरे
दुहेरी शुभेच्छा देण्यास आज आतुर आम्ही सारे !!!

**अनेकोत्तम मधुर आणि सुखद शुभेच्छा**

-वैशाली बताले.



नि:शब्द

शब्दरूपी भाव उमटला भावनांच्या जोडीला
अश्रूंचा बांध फुटला आणि डोळे नाहीत साथीला ...
एक ज्योत जळते अशी दु:ख ठावे वातीला
तमाचीही नाही पर्वा नाही इवल्याश्या पणतीला...
कुठे शोधू ?कुठे पाहू ?वाटे हुरहूर राधेला
गोकुळचा तिचा माधव कुरूक्षेत्री हरवला ...
निळे निळे अम्बर झुले वारा वाही साथीला
पानोपानी हिरवाई लेउन कदम्बही मोहरला ...
फुले कधी ना अपेक्षिली तर कधी काटेही नव्हते साथीला
विरह कसा अन किती साहू? प्रश्न आकाशाचा धरतीला ...
सय तुझी येता कसा श्वास माझा उसवला
सुर, ताल माझ्यापाशी तू मात्र दुरावला...

- वैशाली बताले.


अशाश्वत
दोन किनारे सागराचे पुसती प्रश्न जरी अनुत्तरीत
प्रारब्धापुढे कधी ना चाले कुणाचेच या जगतात...
जलधारा या सरसर येती जणू मेघांची उर्मी दाट
नभही देती कधी कधी भावनांना अश्रू भरली वाट...
विरह मनाचा जगी दिसतसे अवती भवती विश्वात
कोमल भावनांची कधीही लावावी कुणी कशीही वासलात!
भाळीच्या रेखानी दिली जीवनाची तुझी एकाकी वाट
तू अन मी नाही एकटे असती अनेक सोबत...

सागर सांगतो किना-याना सांत्वनाची अनोखी बात
पाणी जरी एक असेल तरी दोन किनारे या जगतात...

दोन किनारे कधी ना भेटती क्षणभंगुर जीवनात

मर्म जीवनाचे समजून घ्या ना काही नाही शाश्वत !

- वैशाली बताले.


!! मन माझे - मन तुझे !!

मन माझे मन माझे कळले ना तुला कधी
मन तुझे मन तुझे कळले ना मला कधी...

*** *** ***

*** *** ***

मन माझे मन माझे कळले आता तुलाही
मन तुझे मन तुझे कळले आता मलाही...

-वैशाली बताले.





!! हार्दिक शुभेच्छा !!

इवलेसे आयुष्य त्यात चढ़ उतार फार
सुख लाभे थोड़े आणि दु:ख़े असती अपार
दिवस रात्रीच्या चक्रात जीवनाला वळणे ती किती ?
अभ्यासाचे दिवस थोड़े आणि त्यात परीक्षेची भीती!
चिन्तातुर मन होई कधी होई हवालदिल

अंधा-या रात्रीत आमच्या शुभेच्छाचे कंदील ...
मार्गातल्या या खाच खळग्यांसाठी कन्दिलाची सोबत

आता येऊ देत कीतीही अडचणीचे पर्वत!

कारण कन्दिलाच्या काचेत आहे “प्रकाश” तुमच्या सोबत !!!
-: वैशाली बताले .

*** यशस्वी भव ***


सर धोपट सरळ मार्ग कधीच कुठे असत नाही ...


वेडया वाकड्या वळणांशिवाय आयुष्यही कळत नाही ...


चिकाटी मेहनत प्रयत्न हाच यशाचा खरा प्राण


एका दिवसात पडत नसते पदरी यशाचे वाण!


उज्ज्वल यश पदरी पडेल होईल तुझा सन्मान


“प्रयत्नांति परमेश्वर” हेच तुला वरदान !


*** मन : पूर्वक शुभेच्छा ***

! ! ! परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !
दर वर्षी येते परीक्षा वाटे तिची उगाच धास्ती
सरळ सोप्या आयुष्यातली जणू आफत नस्ती !
कटू - गोड अनुभव हेच जीवनाचे सार
परीक्षेपुढे मानू नको तू कधीही हार
मन तुझे खंबीर ठेव प्रयत्नाच्या वारुवर तू स्वार हो
आयुष्याच्या सगळ्याच परीक्षेत सदैव यशस्वी हो !

:- वैशाली बताले -:

!!! लग्नाच्या प्रथम वाढदिवसाच्या मधुर शुभेच्छा !!!
मधुर क्षणाच्या हळव्या मनांच्या हळव्या ओल्या आठवणी
सरले वर्ष तरलतेचे ते कळलेही नाही ...
नात्याचा गोडवा जपावा असाच तुम्ही
शुभेच्छाची पखरण करतो आज आम्ही ...
ताटव्यात फुलावेत क्षण प्रीतीचे नसावेत तेथे काटे कुणी
रथ दौडावा दिमाखात परि नसावे कुरकुरणारे चाक कुणी ...
सतार छेडता दो ह्रुदयानी तरंग उमटावे तनामनावर
असे परस्परांचे रेशमी नाते सुखे नांदावे या अवनीवर ...
वैशाली बत्ताले

*** जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ***
स्त्री शक्तीच्या रुपात घडले दर्शन लोभसवाणे
मनी उमटले सुर गाती आनंदाचे गाणे...
झंकारू दे वीणा यशाची नभही व्हावे ठेन्गणे
कर्तृत्वाच्या प्रकाशात चमकावे यशाचे रूप देखणे...
वीणावादनात दन्ग होती देव दानव ऋषी मुनी
अढळपद हृदयात म्हणोनी तू सप्त सुरांची राणी ...
क्षण सौख्याचा करू आपण अत्यानंदे साजरा
आदी शक्तीच्या नवस्वरुपास आमुचा मानाचा मुजरा !!!

-वैशाली बत्ताले.

मी आणि तू

सजून धजून येई रुजून एक ओळ गाण्याची

पापणीत अजून भिजुन एक ओळ पाण्याची...

मी मिटून तू फुलून एक ओळ रुजण्याची

श्वासा मधून ये बहरून एक ओळ भुलण्याची ...

सहज उलून ओठी फुलून एक ओळ जगण्याची

हसत हसत झेलू मरण एक ओळ तरण्याची ...

मी अधीर तू मधुर एक ओळ खुलण्याची

सय येऊन मन बावरुन एक ओळ झुरण्याची ...

मन हरखून तन भिजुन एक ओळ कहाण्याची

तुला स्मरून मी हरवुन एक ओळ बहाण्याची ...

वैशाली बताले.

About this blog

Blog Archive