।। एका वृक्षाची अनवट कहाणी ।।
आरंभापासून अपार कष्ट एका वृक्षाने सोसले असे
उन्हाळ्याला सावली तर पोरक्याला माउली भासे
ॠतू येती,ॠतू जाती,बहर आणि पानगळतीची वृक्ष स्वीकारी कालगती
अशा संजीवन वृक्षाची नंतर सर्वदूर पसरली ख्याती
ऊन, वारा,पाणी यांचे तडाखे सोसून पण नाही पडला कधी तो मोडून ...
पुष्प वृष्टी होता आकाशातून, वृक्ष कृतज्ञ उभा तिथे दोन्ही कर जोडून
मुळं जमिनीत जाती आता पाण्याच्या शोधार्थ
फांद्या विस्तारत जाती परी जपती स्वत:चा स्वार्थ !
वृक्ष भव्य डेरेदार त्याच्या शाखा सर्वत्र पसरल्या
काही कुठारींसाठी मात्र त्याच शाखा मदतीला धावल्या ...
घाव बसे वर्मी मनी वृक्षाच्या घालमेल
उडाले पक्षी सारे परी बिलगून त्यास एक वेल
स्व:त्वावरचे वार झेलित वाटसरुंचा आधार झाले
नि:शब्द तरु आज अपमानाच्या आगीत भस्म झाले !
अपराध काय माझा ? का सोसावे लागे मला असे ?
घर फिरता क्षणी इतके फिरतात का हो कधी वासे ?
ओलाव्याचा शोध घेत मुळे गेली धरतीच्या पोटात
प्रकाशाचा वेध घेत फांद्या गेल्या आकाशाच्या गोटात
माझे सल माझ्या व्यथा आता व्यक्त करू मी कशा ?
दु:ख जाणावया नेहमी जावे लागे त्यांच्या वंशा !
वृक्ष होई अंतर्मुख दरी विचारांची संपवावी कशी ?
मुळं आणि फांद्या यांची पुन्हा जोडावी नाती कशी?
विचारांच्या मोहोळात आज वृक्ष छिनाभिन्न
कधी दिमाखात उभा आज भासे काळाकभिन्न !
चक्रीवादळांना न जुमानणा-या या वृक्षाची ही कथा
एक झुळकीत वा-याच्या उन्मळून पडले अंतरीची मोठी व्यथा ...
मुळे रुजलीच नाही काय मातीमध्ये फार
की मातीनेही मुळांना खरा दिला नाही का हो आधार ?
नाही जडले वृक्षाचे मातीशी कधी नाते
फांद्यांच्याही पल्याड राहिले आकाश फार दूर ते...
एका वृक्षाची अशी ही अनवट कहाणी
वृक्ष म्हणती तयास परी तो संस्थापक वा कुटुंब प्रमुख कोणी !
झाला पुनर्जन्म वसंतात वृक्षास कोवळी पालवी फुटली
सरला शिशिर जीवनातला वेल मनी सुखावली
भावनिकतेचा अनुबन्ध मुळं पानातून तिने रुजवला
एक अमृतवेलीच्या साथीने वृक्ष पुन्हा अन्गोपांगी बहरला...
- वैशाली बताले
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा