एका क्षणार्धात घडले सारे काह़ी...
एका क्षणार्धात घडले सारे काह़ी
अन वेदनांनी थरकापल्या दिशा दाही...
ओढ़ सर्वाना एकच घरटयाकडे परतण्याची
अपेक्षाही नव्हती अशा ऊदध्वस्त क्षणाची
आणि क्षण हा मग उभा ठाकला
निरपराध किंकाळ्यानी आसमंत रडवेला झाला
काय होते,काय झाले,त्या एका क्षणाने होत्याचे नव्हते झाले
झाला चिखल रक्तमांसाचा,मोडला संसार कैकांचा !
त्या संहाराने क्षणभर नियतीही हळहळली
निष्प्राण कलेवरांनी धरणीही कळवली
नि:शब्द आकाश झाले
निरपराध हकनाक मेले
मरणारा केवळ माणूस होता...तो हिंदूही होता मुसलमानही होता !
जे जे मेले ते यातून सुटले
जे अपंग झाले ते जीवंत असूनही मेले !
जगणार होते ते रोज एक नित्य नवे मरण
कारण बनतो कधी माणूसही परिस्थिती शरण !
अशा कित्येक संसाराची,स्वप्नांची राखरांगोळी काळाने का पाहावी ?
इतिहासाची वारंवार पुनरावृत्ती का व्हावी ?
आकाश धरतीला म्हणाले काही
तो मूक आवाज कुणी ऐकला की नाही !
एका क्षणार्धात घडले सारे काह़ी
माणूस आता माणूस राहिला नाही...
कलियुगाचा महिमा हा ही
मरणाची मालिका तू या डोळ्यांनी पाही
कारण माणूस आता माणूस राहिला नाही ...
सामूहिक प्रेतांच्या स्मशानात चित्ता जळत राहिल्या काह़ी
चितांनी मग मनातले प्रश्न स्मशानाला विचारले काह़ी
कारण प्रश्नांशिवाय काह़ीच उरले नाही
त्या प्रश्नांची स्मशानालाही उत्तरे माहीत नाही
सुन्न मी, सुन्न तू आणि सुन्न तो ही !!!
- वैशाली बताले.